Friday, May 26, 2017

व्यवस्थापकांच्या आणखी काही जाती:

खुलासा: एकूण आजूबाजूचे स्फोटक वातावरण लक्षात घेतले तर "जाती" हा शब्द ज्वलनशील वाटतो. त्यामुळे हा शब्द Caste या अर्थी घ्यायचा नसून Specie अशा अर्थाने घ्यायचा आहे. खुलासा संपला.)
आता व्यवस्थापकांच्या आणखी काही जाती पाहूयात.
१)कर्नल: यांचा बाणा लष्करी असतो. खरेखुरे कर्नलही काहीवेळा मवाळ वाटतील असे यांचे वागणे असते. वेळ, मॅनर्स, नियम, पोटनियम इ. जस्सेच्या तस्से पाळले गेले म्हणजे गेलेच पाहीजेत असा यांचा आग्रह असतो. मग नियम पाळण्याच्या नादात कामाचा बोर्‍या वाजला तरी बेहत्तर. समजा, कॉरीडॉरमधून जाताना समोरुन एखादा कर्मचारी येत असला तर त्याने आपल्याला कालमानाप्रमाणे गुड मॉर्निंग/अफ्टरनून/नाईट म्हटले पाहीजे. मग ते त्याच्याकडे अपेक्षेने बघत रहातात. त्याने म्हटले नाही तर हेच त्याला थांबवून तसे म्हणतात. त्यांच्या चेहर्‍यावर अशा वेळेला "काय माणूस आहेस की जनावर?" असे भाव असतात.
सकाळी दहाची कचेरीची वेळ असेल, तर दहा वाजून पाच मिनटांनी मस्टर आत म्हणजे आत. दहा वाजता येऊन बारापर्यंत चकाट्या पिटणारा यांना अकरा वाजता येऊन बारापर्यंत एकाग्र हो‍ऊन चार तासांचे काम एका तासात करणार्‍यापेक्षा आवडतो.
एखादा नियम चुकीचा, जाचक आहे असे सांगीतलेले त्यांना अजिबात खपत नाही.
इथे कुठेतरी वाचलेली एक गोष्ट आठवते. एका लष्करी संशोधन संस्थेत कर्मचार्‍यांना आत येताना आणि बाहेर जाताना सही करण्याची सक्ती होती. तशी असणारच. पण संस्थेच्या भिंतीला एक भलेमोठे भगदाड पडले होते. तिथून कुत्री, मांजरे डुकरे, गाढवे असे वेगवेगळे प्राणी सुखेनैव संचार करत. एक नवनियुक्त तरुण शास्त्रज्ञाने प्रमुखाला पत्र लिहून कळवले की असे असे भगदाड आहे, त्यातून कुणीही आत येऊ शकते. तेव्हा एकतर भगदाड बुजवावे किंवा सही करण्याचा नियम रद्द करावा. प्रमुख लष्करातला होता. हा कालचा पोर, याला कितीसे महत्व द्यायचे असा विचार करुन त्याने पत्राला केराची टोपली दाखवली.
मग या संशोधकाने पठ्ठ्याने काय करावे? एकदा सही करुन आत आल्यावर तो भगदाडातून बाहेर जायचा आणि परत गेटवर जायचा. म्हणायचा, मला आत यायचंय, तुमच्या नियमाप्रमाणे सही करुन. आता गोची अशी व्हायची की त्याची एकदा आत आल्याची सही असायची, बाहेर पडल्याची मात्र नाही. मग जो माणूस बाहेर गेला नाही, तो परत आत कसा आला? पहारेकरी त्याला सांगायचे, तुझी एकदा सही झाली आहे, आता तू असाच आत जा. हा हटून बसला, तुमचाच नियम आहे ना? आत येताना सही करण्याचा? मग? शेवटी पहारेकर्‍यांनी सिक्युरीटी चिफला, चीफने त्याच्याहुन वरीष्ठाला असे करत करत थेट केंद्राच्या प्रमुखापर्यंत मॅटर गेले आणि त्याला शेवटी भिंतीतले भगदाड बुजवावे लागले.
२) परीपुर्णतावादी (Perfectionist)
 फारच हटवादी. यांची समजूत अशी असते की परदेशी विशेषतः जपानी लोकांनी जी काही प्रगती केली आहे ती त्यांच्या परीपुर्णतेच्या आग्रहामुळे. तसे पाहीले तर हे अगदीच बरोबर वाटते. आणि जिथे जितके पाहीजे तिथे तितके परीपुर्ण असलेच पाहीजे.
पण इथे एक ग्यानबाची मेख आहे. परीपुर्णता काही फुकटची मिळत नाही. त्यासाठी रिसोर्सेस लागतात.
स्थापत्य अभियांत्रिकीमधले उदाहरण घेऊ: नकाशात समजा दोन भिंतीमधले अंतर पाच मिटर दाखवले आहे. तर पाच मीटर अधिक किंवा उणे एक सेंटीमिटर  (किंवा सोप्या शब्दात: पाच मीटर, एक सेंटीमिटर इथेतिथे चलता है) असे सांगीतले तर गवंडी दोन भिंती आठ तासात बांधू शकतात. तेच, पाच मिटर, अधिक उणे एक मिलीमिटर असे सांगित तर गवंड्यांना जास्त काटेकोरपणे काम करावे लागेल. जास्त वेळ लागेल.
या जास्त वेळाचे पैसे तुमच्या खिशातून जातील. याही पुढे जात, तुम्ही दोन भिंतीतले अंतर मायक्रॉन्समधे मोजण्याचा दुराग्रह धरलात तर जगातला एकही शहाणा गवंडी तुमच्या दिशेने फिरकणारही नाही.
समजा, तुम्हाला पाच मीटर बाय पाच मीटरची खोली विकत घ्यायची आहे. तुमच्यापुढे दोन अगदी एकसारख्या खोल्या आहेत. एका खोलीची किंमत पाच लाख आहे, दुसर्‍या खोलीची दहा लाख.
पहीली अत्यंत ढिसाळ अशा देशी लोकांनी, मागास अवजारे वापरुन बांधली आहे. यात दोन भिंतीतले अंतर पाच मीटरपेक्षा एकतर एक सेंटीमीटर जास्त असेल किंवा कमी.
आणि दुसरी दहा लाखाची खोली एका परीपुर्णतेच्या पुजार्‍याने बांधली आहे. त्यासाठी त्याने खास जर्मनीहून मेड टू ऑर्डर अशी यंत्रे बनवून घेतली. वेचक गवंडी निवडून त्यांना या यंत्रांवर प्रशिक्षण दिले. आणि साहजिकच तो अशी जागतीक दर्जाची खोली दहा लाखाला विकत आहे. दोन भितीमधले अंतर पाच मीटरपेक्षा एका मायक्रॉनने एकतर जास्त असेल किंवा कमी. लेखी हमी.
तुम्ही दुसरी खोली घेतलीत तर एकतर तुमच्याकडे जादाचा पैसा आहे आणि दुसरी खात्रीची गोष्ट म्हण्जे तुम्ही खोली बांधणार्‍याहूनही जास्त मुर्ख आहात.
उदाहरण जरा अतिशयोक्त असेल, पण याच्या जवळपास जाणारे लोक असतात.
लांबण लावली का?
पुढील भागात थोडेसे सकारात्मक. म्हणजे चांगल्या मॅनेजर्सबद्दल.

Tuesday, May 23, 2017

्यवस्थापकांच्या जाती

गेल्या तीसएक वर्षात ज्या काही साताठ नोकर्‍या केल्या त्यात बहुतेक सर्व कनिष्ठ व्यवस्थापनात किंवा त्याहुनही खालच्या, म्हणजे पाट्या टाकण्याच्या केल्या. या थोड्याश्या अनुभवावरुन मी व्यवस्थापकांचे वर्गीकरण करण्याच्या काही पद्धती शोधल्या आहेत. या वर्गीकरणात जसे अगदी कनिष्ठ पदांवर काम करणारे व्यवस्थापक जसे असतात तसे त्याहुन वरच्या पदांवर काम करणारेही असतात. कामगार लोकांचे, किंवा आयटीमध्ये प्रोग्रॅमर्सचे आपल्या मुकादमाबद्दल किंवा आयटीमध्ये टिम लिडरबद्दल जे मत असते, तेच मुकादमाचे शिफ्ट सुपर्वायजरबद्दल किंवा टिम लिडरचे प्रोजेक्ट लिडरबद्दल, सुपर्वायजरचे प्रॉडक्षन मॅनेजरबद्दल, किंवा प्रोजेक्ट लिडरचे प्रोजेक्ट मॅनेजरबद्दल असते. थोडक्यात हा "युनिवर्सल लॉ" आहे.
तर या जाती येणेप्रमाणे आहेत.
१) दरारेबाज: या मॅनेजर्सची अशी अशी अपेक्षा असते की आपल्याला पाहिल्या पाहिल्या किंवा आपली आठवण झाल्याझाल्या आपल्या हाताखालच्या लोकांनी चळाचळा कापले पाहिजे. असे मॅनेजर कसे ओळखायचे? तर ते ओळखण्यासाठी फार काही करावे लागत नाही. त्यांची ओळख ते स्वतःच करुन देतात. हे मॅनेजर्स राउंडला निघाले की काय करतात?
एकतर एखाद्या टेबलसमोर उभे रहातात. सहजच टेबलवर हात ठेवतात. टेबल जरी सकाळीच लख्ख पुसले असले तरी त्यावर थोडीशी धुळ जमली असतेच. मग शिसारी आल्यासारखा चेहरा करुन ते प्युनच्या नावाने ओरडतात. प्युन बिचारा धावतपळत येतो. त्याला हातावरचे दोनचार धुळीचे कण दाखवून विचारतात, "हे काय आहे?" मग पुढे प्युनला तंबी दिली जाते, पुन्हा धुळ दिसली तर कामावरुन काढून वगैरे टाकू म्हणून. इथे प्युनवर केलेला आरडाओरडा हे केवळ निमित्त असते. खरा हेतू आपल्या अकांडतांडवाची सर्वांनी नोंद घेऊन आपल्या धाकात रहावे हा असतो.
२)शिक्षक: असे मॅनेजर्स हे एकदम मॅनेजरच्या खुर्चीत बसलेले नसतात तर अगदी कनिष्ठ पदांवर काम करुन वरपर्यंत पोचलेले असतात. हे राउंडला बाहेर पडले की, समजा ती आयटी कंपनी असेल तर, एखाद्या टर्मिनलसमोर उभे रहातात. प्रोग्रॅमर बिचारा अगदी तल्लीन हो‍ऊन, आपल्याच नादात काम करत असतो. ते टर्मिनलमधे डोके खुपसतात. प्रोग्रॅमर्सची युनिवर्सल सवय म्हणजे वेरिअबल्सना "अशक्य" अशी नावे देण्याची. ते प्रोग्रॅमरने दिलेल्या एका yoyo
या वेरिएबलवर बोट ठेऊन "इथे इथे नाच रे मोरा" सारखे नाचवत विचारतात, "हे काय आहे?"
"total number of days.. प्रोग्रॅमर फिकटसे हसून म्हणतो.
"पण मला तर yoyo असे दिसतंय."
"नाही मी शेवटी ते Find and replace
ने बदलणार आहे."
"पण समजा, पुढचा आठवडा तू कामावर आला नाहीस, किंवा तुझे काही बरेवाईट झाले आणि हा कोड दुसर्‍या एखाद्याला दिला, तर?" मॅनेजरच्या दृष्टीने त्याने गमतीगमतीत बिनतोड युक्तीवाद केला असतो, प्रोग्रॅमरला हसावेच लागते.
३) येडे हवालदार: तुम्ही रस्त्यावर असे येडे हवालदार पाहिले असतील. वाहत्या रहदारीचा रस्ता असतो, रस्त्याला दोन फाटे फुटत असतात, काही वाहनांना डावीकडे जायचे असते, काहींना उजवीकडे. अशा ठिकाणी हे स्वतःला हवालदार समजणारे येडे उभे असतात. समोरुन येणार्‍या वाहनाला कुठे जायचेय याचा ते अंदाज घेतात आणि त्याला शिट्ट्या फुकूंन फुकूंन तिथेच जायला सांगतात. खरे तर या येड्या हवालदारांना फाट्यावर मारुन ज्यांना जिथे जायचे असते तिथेच ते जात असतात. शेवटी कंटाळा आल्यावर हे घामेघूम हो‍ऊन बसतात आणि म्हणतात "हुश्श...दमलो बुवा, काय पण ना, लोकांना अजीबात शिस्त म्हणून नाही. मी होतो म्हणून, नाहीतर काय झाले असते..."
असे मॅनेजर्स काय करतात? समजा एखाद्या आस्थापनेतल्या कर्मचार्‍यांना त्यांचा अर्ध्या तासाचा लंच ब्रेक अपुरा वाटत असेल, तर ते दहापंधरा मिनीटे उशीराने येतात. किंवा काम करुन करुन कंटाळा आला की संगणकावर गेम्स खेळतात. मॅनेजर अगोदर थोडे मेमो देऊन बघतो. मग शेवटी फर्मान काढतो, "आजपासून लंच ब्रेक पाऊण तासाचा करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांच्या स्वास्थ्याची संस्थेला काळजी आहे, त्यामुळे पाऊण तास काम करण्यास कर्मचार्‍यांना मनाई करण्यात येत आहे."
किंवा
"अमेरीकेतल्या मॅकडोनाल्डस् युनिवर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे की अर्धा तास संगणकावर गेम्स खेळल्याने कार्यक्षमतेत साडेसात ते पावणेआठ टक्क्याने वाढ होते. त्यामुळे रोज तीन ते साडेतीन या वेळेत कर्मचार्‍यांनी गेम्स खेळणे अनिवार्य केले जात आहे. या वेळात कुणी काम करताना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही."
आहे की नाही?
४)सहानुभूतीदार: एखादा कर्मचारी, विशेषत: स्त्री कर्मचारी जर उदास वगैरे दिसला तर हे त्याच्या जवळ जातात. त्याला जरी नको असले तरी धीर वगैरे देतात. त्याला खोदखोदून उदासीचे कारण विचारतात. त्याचा अगदी पिच्छाच पुरवतात.
५)Target oriented: यांना फक्त काम किती टक्के झाले आहे किती बाकी आहे, कधी होईल, त्यासाठी कोणते रिसोर्सेस लागतील एवढ्याशीच देणेघेणे असते.
"Mr. ____ How much percent is over?"
कर्मचारी अंदाजपंचे काहीतरी चाळीसपन्नास टक्के असे ठोकून देतो.
But you took one week for first ten percent
and in another week you finished thirty
percent, how come?" मॅनेजरचे डोळे "कसे कचाट्यात पकडले की नाही?" अशा अर्थाने लकाकत असतात. अशा वेळेला, पहिल्या आठवड्यात मी प्रोग्रॅमच्या रुपरेषेवर विचार करत होतो, त्यामुळे वेळ लागला, असे सांगणे फजूल असते. तुम्ही दोन दिवस सुट्टी घेतली किंवा अगदी आठवडाभर घरुन काम केले तरी त्याला मॅनेजरची काही हरकत नसते. काम संपल्याचे मेल डेडलाईनच्या वेळेस मॅनेजरच्या इनबॉक्समधे गेले पाहिजे, मग तुम्ही वाटेल ती झक मारा.
बरेचदा या डेडलाईन्स निम्म्याने अगोदरच सांगीतल्या जातात, पण आव मात्र असा आणतात की "अरेच्चा, हे काम तर कालच व्हायला पाहीजे होते."
काही वेळेला मात्र या डेडलाईन या "फिक्स्ड प्राईज शॉपसारख्या खर्‍याखुर्‍या असतात आणि तुम्ही त्या पाळल्या नाहीत तर तुमची काही खैर नसते.
६)Motivators and Visionaries: हे भिंतीवर जिथे म्हणून मोकळी जागा दिसेल तिथे त्यांना जी प्रेरणादायक वचने वाटत असतात, त्यांचे फलक टांगत असतात. नवखे लोक सोडले तर असे फलक सगळेजण खुंटीला टांगून ठेवतात. असे मॅनेजर लोक्स मधूनमधून मिटींगा घेतात. मिटींगमधे विचारतात, "अजून
दहा वर्षांनी तुम्ही स्वतःला आमच्या संस्थेत कुठे पहाता?" असे काहीतरी. कर्मचारी मनातल्या मनात म्हणत असतात, "अरे, कंपनीकडे काही प्रोजेक्ट्स आहेत का? इथे दहा वर्षे कोणी जगेल की नाही सांगता येत नाही, आणि हा काय बाता करतोय?"
किंवा हे कर्मचार्‍यांना जबरदस्ती डोळे मिटायला लावतात आणि म्हणायला लावतात, "मी माझे काम मनोभावे करीन. माझी कार्यक्षमता रोज वाढत आहे."
कर्मचारी मनातल्या मनात म्हणत असतात, "लेका तुच डोळे मिट आणि म्हण, मी कर्मचार्‍यांना वीस टक्के पगारवाढ देत आहे. त्यांच्या कामात फुकटची लुडबूड करत नाही आहे." पगार वाढव आणि मग बघ कसे दे दनादन काम करतो ते.

मॅनेजर्सना अर्थातच स्वतःची बाजू असते. काहीवेळेला कर्मचारी इतके नाठाळ आणि माजोरडे असतात की "दरारेबाज" राहीले नाही तर ते फाडून खातील. आणि अनेकदा अशा दरार्‍याचा मुखवटा पांघरलेले मॅनेजर्स आतून अतिशय सहृदय आणि मृदू असतात.
जिथे कर्मचारी सेल्फ मोटीवेटेड असतील तिथे "येड्या हवालदारा"चीच भुमिका करणे शहाणपणाचे असते.
मोटीवेटर्सनी परदेशच्या वारीमधे त्या टेक्नीकची जादू प्रत्यक्ष पाहीलेली असते.
[सदरहू पोस्ट फक्त आणि फक्त विनोदी अंगाने लिहीली आहे, ती योग्य त्या स्पिरीटमधे घ्यावी ही विनंती.]

Friday, May 5, 2017

आसिमका सरफिरोसे मुकाबला : भाग आठ

सकाळी उठल्यावर डोळे चोळत आसिम दरवाजात आला. फडफड आवाजाने त्याची झोपमोड झाली होती. पहातो तो काय? अंगणात कुणीतरी सोडलेले एक पिल्लू फडफडाट करत होते. जवळ जाऊन आसिमने त्याचा आवाज ऐकला.
ऐकतो तो काय? "कुठेतरी कसला तरी जमीन का टुकडा होता, त्याच्यावरुन झगडा चालला होता.
असा काहेतरी फडफडाट ऐकू येत होता. आसिमला नेहमीप्रमाणेच प्रश्न पडला, अरे ठिक आहे, कोणतातरी फार मोठा जमीनका टुकडा आहे, त्यावरुन कसला तरी झगडा चाललाय" अशी पिल्ले माझ्या अंगणात कशाला सोडताय? गनी आणि नूर, किंवा आणखी कुणी यांचा जो काही झगडा असेल, तो त्यांनी आपसात सोडवावा. माझ्याशी काही वास्ता असेल तर रीतसर माझ्याशी मुलाकात करावी. बस्स, इतनी सिधीसी बात. नूरने असे केले, तसे केले, तिची शादी झाली, झाली नाही, ती विलायतेला पळाली, परत आली. परत पळाली. यॅव नी त्यॅव नी त्यॅव. मला कशाला सांगताय? नूर काय तुम्हाला वर्दी देऊन सगळं करते वाटतं? असे नूरला पुढे करुन किती दिवस तुमच्या चाली चालणार? अगदी कुछ महीनो पहले, याच नूरशी माझी शादी करुन देण्यासाठी तुम्ही कंबर कसली होतीत ना? मग आता एकाएकी काय झाल?
कुछ दिनो पहले ही, तुम्हीच म्हणत होतात ना, आसिम बाहरसे भोला, अंदरसे चालू है?" आणि नंतर तुम्हीच म्हणत होतात ना? "आसिम बाहरसे खुष दिखता है, अंदरसे हमने उसे दुखी किया है?" बाहरसे यॅव, अंदरसे त्यॅव है?" अरे ऐकून ऐकून कान किटले माझे. तुम्हाला बोलून बोलून कंटाळा नाही आला?
निट कान खोलून ऐका. काहीही झाले, काहीही झाले, तरी मी तुमच्याकडे कधीच आश्रय मागणार नाही. तुमच्या दिखाव्याला कधीच भुलणार नाही.
तुमच्यातला एक कधीच होणार नाही.
तुमचा रस्ता वेगळा आहे, माझा वेगळा. आपण एकमेकांचे दोस्तही नाही, दुश्मन तर नाहीच नाही. बेवजह, किंवा तुमच्यासाठी काही वजह असली तरीही, माझ्याशी दोस्तीही करु नका, आणि दुश्मनीही. तुमच्याकडे दादफिर्याद कधीच मागणार नाही. कधीच. कधीच.
दाद मागण्याची, फरियाद करण्याची माझी ठिकाणे वेगळी आहेत.
अश्या गनी, नूर आसिम यांच्या नावाने कंड्या पिकवण्यापेक्षा तुम्ही चांगलेसे काही का करत नाही?

Friday, April 28, 2017

आसिम का सरफिरोंसे मुकाबला : भाग सात

"बाहेर पड आसिम, या सगळ्यातून बाहेर पड."
गेल्या साताठ् महिन्यात आसिमला किमान दहाव्यांदा हे सांगण्यात येत होते.
आणि हर बार की तरह आसिमला यावेळेलाही सवाल पडला होता, कशातून बाहेर पडू?
"अरे उलट तुम्हीच बाहेर पडा या सगळ्यातून. या सगळ्यातून म्हणजे आसिम कशात तरी फसला आहे आणि आपण त्याची मदत करत आहोत या भ्रमातून." आसिमला सांगावेसे वाटे.
"नही नही, आसिम की कोई गलती नही है" हे सुद्धा अनेकदा बोलून झाले होते.
अगदी सुरुवातीला आसिम कसा नालायक, निकम्मा, पागल... वगैरा वगैरा आहे हे बरेच दिवस लावून धरण्यात आले होते.
मग "नही, नही, वो नूर ही ऐसी है" असे पालूपद आळवून झाले होते.
मधेच एकदा, "त्या सावळ्या तांडेलनेच हे सर्व केले" असा ओरडा केला जात होता.
अरे काय चाललंय तरी काय?
आसिमला थेट कोणी साधूपुरुष असल्याच्या ते थेट खलनायक असल्याच्या जत्रेतल्या पाळण्याची सफर घडवण्यात आली होती. महाधूर्त, कपटी, लबाड अशी विशेषणे अगदी शोधून शोधून वापरण्यात येत होती. म्हणजे आसिमने एकतर साधूपुरुष असावे किंवा नाहीतर शैतान की औलाद.
आणि आता तर थेट "गनीच वैसा है" बोलताय?
अरे, चंद दिनोकेही पहले, त्या गनीची साक्ष काढून आसिमला गाली बकत होतात, इतक्यात एवढा बदल?
प्रत्येक वेळेला आसिम हात जोडून सांगत होता, अबतो बस करो, अब तो बस करो. मी कशात सापडलोच नाहीये तर सुटण्याचा प्रश्नच कुठे येतो?
म्हणजे छोट्या बच्चांना कसं सांगतात, "अरे, बेटा उस कौवेने सब किया, हात रे कौवे, चल भाग यहासे, देखो अब वो उड गया, अब जाओ खेलो कुदो, तशातला प्रकार चाललाय की काय?
गनी, नूर किंवा आणखी कुणी, जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत मला काय करायचाय, ते कसे आहेत ते?
एकदा मागे, दोस्तीचा हात पुढे केला होता, तो झिडकारला, ठिक आहे त्यांची मर्जी.
आता काय आहे?

Thursday, April 20, 2017

हजामो बार्बरो न्हावी : भाग पाच

https://prezi.com/dcjh2k2btkjj/hammerhead-shark-and-barber-fish/
दुपारची वेळ असते. सकाळी उठल्याउठल्या शार्कच्या अगदी समोरच एक छोट्या माशांचा थवा आलेला असतो. कोणते मासे असतात शार्कलाही माहित नसते. पण तरीही त्याने तो आख्खाच्या आख्खा थवा स्वाहा केलेला असतो. आम खानेसे मतलब, पेड गिननेसे क्या फायदा? असा सूज्ञ विचार शार्कने केलेला असतो. शार्क कसेही दिसत असले तरी तेही सूज्ञपणे विचार करु शकतात हे यावरुन स्पष्ट व्हावे. उपारी एकच्या सुमारास एक सुरमई माशांचा थवा त्याने पाठलाग करुन गिळंगृत केलेला असतो. साहजिकच आता तो पेंगुळलेला असतो. पण दुपारच्या लंचमधले काही अन्नकण  त्याच्या दातात अडकले असतात. कल्ल्याचा एक मोठा तुकडा सडलेला असतो. आणि त्यामुळे त्याला झोप येत नसते.
तिकडून देवदुतासारखा न्हावी मासा येतो. शार्क त्याची वाटच बघत असतो. तो आ वासून न्हावी माशाचे स्वागत करतो. न्हावी मासा बेलाशक त्याच्या उघड्या जबड्यात शिरतो. दातातले अन्नकण साफ करतो. कल्ल्याचा सडलेला भाग फस्त करतो. दुसरीकडे पाठीवर आलेली बुरशीही चाटूनपुसून टाकतो. आणि या शार्कने भरभ्रुन दिलेली दुवा स्विकारुन दुसर्‍या  शार्ककडे निघून जातो.

Thursday, April 13, 2017

इलेक्टॉनीक पाळत

याआधीच्या एका ब्लॉगपोस्टमधे अमेरिका व इतरत्र सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्विलियन्सविरुद्धच्या चळवळीचा उल्लेख आला आहे. त्या अनुषंगाने आणखी थोडेसे:
पंधरावीस वर्षांपुर्वी किंवा त्याच्याही अगोदर आपल्याकडे इंटरनेटचा आजच्याइतका बोलबाला नव्हता. पण पाश्च्यात्य देशात मात्र इंटरनेट स्थिरावले होते. त्याकाळात एक इंग्रजी चित्रपट बघितला होता. त्यात असे दाखवले होते की एका व्यक्तीचे एटीएम कार्ड, मेल पासवर्ड वगैरे मिळवून, त्या व्यक्तीच्या मागावर असलेले काहीजण ति जिथून पैसे काढेल, जिथून इमेल बघेल, तिथे काही क्षणातच हजर होतात वगैरे वगैरे. त्याकाळात फक्त कल्पनेच्या भरार्‍या वाटल्या होत्या, पण आता त्याहूनही प्रगत असे सर्वीलियन्स
करणे शक्य झाले आहे.
सरकारी सर्विलियन्स, मिलिटरी सर्वीलियन्स ही वेगळी गोष्ट आहे. त्याला Big Brother is watching  असे काहीतरी म्हणतात. आपल्यापैकी बहुसंख्यांना बिग ब्रदर, स्मॉल ब्रदर, मधला भाऊ असे कोणीही पाळत ठेवली तरी फार काही फरक पडायला नको. कारण आपण फक्त इमेल वाचणे, ऑनलाईन शॉपिंग, इतर माहीती मिळवणे, नोकरी शोधणे, वर/वधू शोधणे इतपतच इंटरनेट वापरतो. आणि त्याल इतक्या मोठ्य़ा पातळीवर कोणाला रस असण्याचे काही फार कारण नाही.
प्रश्न तेव्हा येतो, जेव्हा वैयक्तीक कारणासाठी असा सर्विलियन्स ठेवला जातो तेव्हा. हे सर्व लिहायला निमीत्त ठरली ती एका आठवड्याआधी वाचलेली एक बातमी. त्यात असे म्हटले होते, की काही खासगी डिटेक्टीव कंपन्या टेलिकॉम कंपन्यांकडून कॉल लॉग्स आणि इतर माहीती मिळवून, त्यात काही बनावट एंट्रीज करुन, आपल्या क्लायंट्सची दिशाभूल करत असत. त्यात असेही म्हटले होते, की एका ठरावीक अधिकारपदावरच्या पोलीस अधिकार्‍याशिवाय इतर कुणीही असे लॉग्स मागू शकत नाही.
पण आपल्यासारख्या देशात, जिथे काही हजार रुपयांच्या बदल्यात समुद्रकिनार्‍यावर जिथे आरडीएक्ससारख्या स्फोटकांच्या गोण्या उतरवल्या जातात तिथे अशा प्रकारचा सर्विलीयन्स थांबवणे शक्य होईल असे वाटत नाही. तरीही आधीच्या पोस्टमधे म्हटल्याप्रमाणे याबाबतचे नियम काय आहेत याची उत्सुकता असल्याने त्याबाबतचा अर्ज माहीतीच्या अधिकाराखाली करणार आहे. त्यासाठी लागणारे कोर्ट फी स्टॅम्पही आणले आहेत. पण मसुद्यात नेमके काय लिहायचे हे अजून सुचत नाहीये.

Monday, April 10, 2017

किर्द कारकिर्द : भाग तीन

माझ्या नोकरीच्या कालखंडातला सगळ्यात संस्मरणीय काळ कोणता असे विचारले तर मी नक्कीच पुण्याच्या गोरे जोशी टुल्स मधल्या तीनचार वर्षांची आठवण काढीन.
वयाची गद्धेपंचवीशी होती. अंगात रग होती. त्यामुळे सकाळी आठ ते संध्याकाळी साडेचारपर्यंतची वर्कशॉपमधली दगदगीची नोकरी, त्यानंतर पिंपरीहून बसने एकदिडतासाचा प्रवास करुन पुण्याला, मग नऊपर्यंत कॉलेज आणि मग परतीचा प्रवास करुन पिंपरीला परत. दिवस कधी उजाडायचा आणि कधी मावळायचा समजायचेच नाही.
गोरे जोशी टुल्समधे नोकरी लागल्यावर मला आनंद अशासाठी झाला की ती ज्याला "टुलरुम" म्हटले जाते त्यातली नोकरी होती. आधीची नोकरी ही मुंबईला एका पेनांची रिफील्स बनवणार्‍या कंपनीत होती. तिथे स्विझर्लंड आणि इटलीमधून आयात केलेली अत्यंत गुंतागुंतीची आणि सोफिस्टीकेटेड यंत्रे वापरत असत. Albe SA  असे ती यंत्रे बनवणार्‍या कंपनीचे नाव होते. त्या यंत्राची रचना समजून घेणे, त्यांची देखभाल हे अत्यंत कौशल्याचे काम होते. त्या काळातल्या प्रसिद्ध अशा विल्सन पेन्स ची इको शार्प म्हणून दुसरी कंपनी होती तिच्यात मी कामाला होतो, त्याविषयी पुढल्या भागात..
पण या यंत्रात मिळालेले कौशल्य हे इतरत्र उपयोगी पडण्यासारखे नव्हते. त्यामुळे मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी उपयोगी पडेल अशा टुलरुम किंवा त्यासारख्या दुसर्‍या संधीच्या शोधात होतो.
तशी संधी गोरे जोशी टुल्समधे मिळाली. तिथल्या कामाचे तांत्रीक तपशील इथे न देता, मी तिथले कामगार ज्या गमतीजमती करत ते सांगणार आहे.
माझा कामावरचा अगदी पहीला आठवडा होता. मला कोणाचीच नावे वगैरे तितकीशी माहीत नव्हती. पाचसात वर्कर्सच्या एका गटाने मला सांगीतले की तो जो माणूस तिथे काम करतोय ना? त्याला विचार की "जवा नवीन पोपट हा" हे गाणे ऐकले आहे का? त्या काळात ते गाणे फार गाजत होते. मला जरा चमत्कारीक वाटले पण त्यांनी मला अगदी भरीलाच घातले. शेवटी मी त्यांना जाऊन विचारले. त्यांच्या चेहर्‍यावर अगदी थोड्य़ावेळाकरता रागाची छटा चमकून गेली. पण मग त्यांनी विचारले, "तुला असे विचारायला कोणी सांगीतले?"
मला बाकीचे कामगार खुणावून सांगत होते, सांगू नकोस, सांगू नकोस म्हणून, पण मी अमक्या अमक्यांनी सांगीतले असे सांगीतले.
त्या माणसाचे नाव "पोपटराव" असे होते आणि म्हणून हा सगळा उपद्व्याप.
कामावरचे आठ साडेआठ तास ही मंडळी मन लाऊन काम तर करतच, पण अशा गमतीजमती करुन मन रमवीत.
एखादा वर्कर जागा सोडून गेला की त्याच्या मशीनचे जे व्हील असे, त्याला काही खट्याळ लोक ग्रीस लाऊन ठेवत. आपल्या तंद्रीत तो वर्कर परत आला की त्याचे हात ग्रीसने माखत असत.
ठाण्याचा जो जेके उद्योगसमूह आहे त्यातली जेके फाइल्स म्हणून कंपनी लोखंड घासण्यासाठी वापरल्या जाणार्‍या फाइल्स बनवत असे, अजूनही बनवत असेल. त्या फाईल्स बनवणारी जुन्या यंत्रांची डागडूजी करुन ती पुन्हा चकाचक करण्याचे काम त्यावेळेस गोरे जोशी कंपनीत चालत असे. तिथली यंत्रे डागडूजी करुन झाल्यावर तपासण्यासाठी एक महादेव तुकाराम उपाख्य अप्पा शेटे नावाचे गृहस्थ येत.
ती दिवाळीच्या नरकचतुर्दशीच्या आदली रात्र होती. दुसर्‍या दिवशी मशीन नेण्यासाठी म्हणून ट्र्क मागवला होता. आणि आयत्या वेळेला मशीन चालेना. मला खरे तर दिवाळीसाठी म्हणून मुंबईला घरी जायचे होते. पण आयत्या वेळेला हा प्रोब्लेम आल्याने शेवटी ती रात्र कंपनीतच काढावी लागली. पहाटेचे तीन वाजले होते. मी, कारंडेसाहेब आणि शेटे अशा तिघांनी झटून यंत्र सुरु केले होते. पण त्या यंत्राला हात लावल्या लावल्या विजेचा सौ‍म्य झटका बसत होता. यंत्र चालवायचे तर त्याला स्पर्श करणे भाग होते.  
तिघांचीही डोकी चालणे बंद झाले होते. शेटे म्हणत होते, एकदा यंत्र चालले की झाले, शॉक का बसतोय ते मी बघेन. पण यंत्र चालवायचे म्हटले तर शॉक बसतो. तिघेही सुन्न हो‍ऊन बसलो होतो.
मी सुन्न झालेले डोके जागेवर आणण्यासाठी म्हणून थोडी बाहेर चक्कर मारायला गेलो. पायात बाजूलाच पडलेल्या कोणाच्यातरी रबरी स्लिपर्स घातल्या, बाहेर चक्कर मारुन दहा पंधरा मिनीटात परत आलो, सहज म्हणून मशीन सुरु केले. आणि आश्चर्य म्हणजे आता मशीनला शॉक लागत नव्हता. ही किमया माझ्या पायातल्या रबरी सपातांची होती. मी दोघांना बोलवले आणि पुढे मग अर्ध्या तासात मशीनचे टेस्टींग करुन आम्ही घरी गेलो. दिवाळीच्या पहाटेचा घरी जायचा मुहूर्त चुकलाच होता. पण तरीही सकाळी सहाची एशियाड पकडून मी सकाळी अकराला घरी आलो.
याऊलट नोकरीतला सर्वात वाईट काळ कोणता असे विचारले तर मी जयंत टिपणीस कन्सल्टन्टसमधली नोकरी सोडण्याच्या आधीचा एक महीना ते पुढली दोन वर्षे असे सांगेन.
मी नोकरीचा दुसर्‍यांदा राजीनामा दिला होता. नोटीस पिरियडचे पंधरा एक दिवस संपले होते. अचानक एक दिवस मला टिपणीस साहेबांनी बोलाऊन घेतले आणि त्यांच्याकडल्या फ्लॉपींपैकी साठसत्तर फ्लॉपी कमी असल्याचे सांगीतले. आणि सगळ्यात सिनीयर व्यक्ती म्हणून याच्याकरता तू जबाबदार आहेस असे मला सांगीतले. तशा अर्थाचा मेमोही मला दिला. मी लगेच माझे उत्तरही दिले.
मी त्यातल्या तीनचार फ्लॉपी घेतल्या होत्याच, पण त्यात मी काही मोठा लाखमोलाच दस्तावेज घेतला नव्हता. त्या काळात प्रसिद्ध असलेला "डूम" नावाचा एक गेम मी माझ्या स्वतःच्या फ्लॉपी आणि तो गेम खूप मोठा होता म्हणून त्यांच्याकडल्या थोड्या अशा घेऊन कॉपी करत होतो. आणि हा काही चोरीचा मामला नव्हता. सगळ्यांच्या देखत, मी तो गेम फ्लॉपींवर घेतला होता, आणि घरच्या संगणकावर तो गेम टाकल्यावर मी त्या फ्लॉपी पुन्हा आणून ठेवणार होतो.
मला मेमो मिळाल्यावर मला भितीपेक्षाही जास्त वाईट वाटले. एका महीन्याआधी मला जो सिनीयर सिनीयर म्हणून मान मिळत होता, तो फक्त इतक्या किरकोळ बाबीने काढून घेतला जावा, एखाद्या भुरट्या चोरासारखी वागणूक मला मिळावी याचे ते वाईट वाटणे होते.
झाल्या प्रकाराने, पोलीसात तक्रार करण्याचे बोलले गेल्यामुळे मी इतका गांगरुन गेलो होतो की मी लगेच त्या दहाबारा फ्लॉपी घेतल्या आणि दुरवर टाकून आलो.
टिपणीस सर त्या वेळेला असे का वागत होते हे मला अजूनही उलगडलेले नाही. खरे तर वास्तुविशारद असणे ही आत्ताही फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या काळात तर ती मोठीच गोष्ट असणार. ते पुर्वी आसाममधे होते, तिथे त्यांनी बर्‍याच पुलांचे वगैरे काम केले होते, असे ऐकले होते. त्यातले काही आराखडे, उदा: रेल्वे स्टेशनच्या वर बांधायच्या कमर्शियल कॉम्प्लेक्सचा आराखडा मी पाहीले होते.