Wednesday, May 21, 2008

आमचा कोकणदौरा

"अविनाश, जरा कपाटावरची सूटकेस काढून तिची चेन रीपेअर करून आण बरं!" कुटुंबाचे फ़र्मान सुटले आणि मी ओळखले की यंदा कोकणात जायचे नक्की झाले. कुटुंबाच्या मनात काय आहे ते असे आडवळणानेच ओळखावे लागते.


तसे लग्न झाल्यावर दोन तीनदा आम्ही कोकणात गेलो होतो. पण ते फ़क्त दापोलीला जाउन तिथे तीन चार दिवस राहून परत. (दापोली हे कुटुंबाचे गाव.) ह्या वर्षी मात्र तसे न करता कोकणात जमेल तितकी भटकंती करायची असे मनात होते. एक मे ला म्हणजे गुरवारी मला सुट्टी होती. तेव्हा शुक्रवारी एक दिवस रजा टाकली तर गुरवार शुक्रवार शनवार व रवीवार असे सलग चार दिवस मिळत होते. एप्रिलच्या पहील्या आठवड्यापासुनच रजेसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्यावर असे समजले की शुक्रवारी दोन मे ला नेमकी एक डिलीव्हरी आहे.
(प्रोजेक्टची डिलीव्हरी. गैरसमज नसावा.) तेव्हा रजेवर जाण्याच्या अगोदर सर्व काम पुर्ण झाले तरच रजा मिळणार होती. शेवटी अर्थस्य पुरुषो दासः हेच खरे.


रजा मिळणे अनिश्चित झाल्यामुळे फारच पंचाईत झाली. रेल्वे किंवा एस्टीचे आरक्षण केले असते आणि रजा मिळाली नसती तर पैसे वाया गेले असतेच पण सर्वांचा विरसही झाला असता. आणि आरक्षण न करावे तर रजा मिळाल्यास आयत्या वेळेला प्रवासाची सोय कशी होणार ही भिती. शेवटी ठरवले... जो होगा देखा जायेगा. एकीकडे आँफ़ीसचे काम जोरात सुरु केले की जेणेकरुन रजेची वेळ येइपर्यंत काम संपेल आणि एकीकडे प्रवासाची तयारीसुद्धा हळुहळु सुरु केली. तेवढ्यातल्या तेवढ्यात कुटुंबाने स्वतःची सरकारी नोकरी व माझी खासगी नोकरी यांची रितसर तुलना केली.

प्रवासाची तयारी करणे म्हणजे माहीती काढणे आले आणि माहीती काढणे म्हणजे गूगल वापरणे आले.
मी कोकणदौयाची तयारी करत असताना गूगल इन्क. मधले लोक "koakan" "kokan maps" "kokan travelling" "kokan hotels" इत्यादी शब्दांचे searches एकाएकी वाढल्यामुळे बुचकळ्यात पडले असतील असा माझा अंदाज आहे.

कोकणात जायचे चार मार्ग आहेत. एक म्हणजे MSRTC उपाख्य ST ची बस. हा सगळ्यात सोपा अणि सर्वांना परवडेल असा मार्ग. तुमच्या प्रवासाच्या तारखा निश्चित असल्यास आणि सुट्टीचा मौसम असल्यास महीनाभर आधी आरक्षण केलेले उत्तम. दुर्दैवाने ST चे आरक्षण अजुन internet वरुन होऊ शकत नाही.
http://msrtc.gov.in// ही आहे ST ची official site. ही site मराठीत आहे. येथे सर्व डेपोंमधून सुटणाया बसेसचे वेळापत्रक दिले असले तरी त्याची विश्वासार्हता मला तरी शंकास्पद वाटते.
वेळोवेळी वेळापत्रकात होणारे बदल site वर update होत असतील की नाही काही सांगता येत नाही.
शिवाय सुट्यांच्या दिवसात सोडल्या जाणाया जास्तीच्या गाड्यांची माहितीसुद्धा येथे मिळत असेल असे वाटत नाही. "Get timetable by SMS" अशीही एक सुविधा येथे आहे पण मी तिचा उपयोग केला नसल्यामुळे त्याविषयी काही भाष्य करणे उचीत होणार नाही.

मुंबईचा मुंबई सेंट्रलचा ST डेपो हे ST चे मुख्यालय. मुंबईतून मुंबई सेंट्रल, परळ, नेहरूनगर(कुर्ला), बोरीवली इ. ठिकाणांहुन बाहेरगावी जाणाया ST च्या बसेस सुटतात. ह्या बसेस आराम,निम-आराम व साध्या अश्या प्रकारच्या असतात. ST चे भाडेही खासगी बसच्या तुलनेत बरेच कमी असते. रत्नागिरी ते मुंबई ह्या साधारणपणे ३५० ते ३७५ किमी प्रवासाला आम्हाला रु ३६० फक्त प्रतिमाणशी पड्ले.

कोकणात जाण्याचा दुसरा तितकाच सोयीचा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेविषयी बरीच माहीती google वापरून मिळू शकते. हिचे आरक्षणही internet वरुन होऊ शकते. तुम्हाला कोकणात एकाच ठिकाणी बराच काळ मुककामाला जायचे असेल आणि तुमचे मुक्कामाचे ठिकाण रेल्वे स्टेशनपासुन जवळ असेल तर कोकण रेल्वे सोयीची पडेल.पण दापोली,गुहागरसारख्या स्टेशनपासुन लांब असलेल्या ठिकाणी जावय़ाचे असल्यास मात्र STच बरी.

पुर्वी जेव्हा ST नव्ह्ती तेव्हा लोक बोटीने कोकणात जात असत. मध्यंतरी पश्चिम किनायावर howercraft service सुरू करणार आहेत असे ऐकले होते. पुढे काय झाले काही समजले नाही. "तुकाराम" नावाच्या बोटीला जलसमाधी मिळाली होती असेही कुठेतरी वाचल्याचे आठवते.

कोकणातले रस्ते सुधारल्यापासुन (आणि कोकणातल्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यापासून) हल्ली बरेच लोक स्वतःच्या किंवा भाड्याच्या खासगी गाडीने कोकणात जाऊ लागले आहेत. साताठ माणसे असल्यास आणि कमीतकमी वेळात बयाच ठिकाणी जावयाचे असल्यास ते सोयीचेही पडते. चारपाच माणसांना चारपाच दिवस कोकणात sumo सारख्या वाहनाने जायचे असल्यास प्रवासखर्च,जेवणखाण,रहाणे व इतर खर्च मिळुन १२ ते १५ हजार रु अंदाजे खर्च येतो. स्वतःचेच वाहन असल्याने
मनसोक्त भटकता येते. आमच्या कुटुंबाच्या कानावर सहज माहीती म्हणुन हा पर्याय घातला असता, माझी वर्तणूक ही सकाळीच लाँटरी फुटलेल्या इसमासारखी कशी असते ह्याविषयी शेरेबाजी ऐकायला मिळाली. दहा हजार रुपयांत आणखी काय काय येऊ शकते याची भली मोठी यादीच बनवली गेली. गंमतीचा भाग म्हणजे या यादीतली एखादी गोष्ट आणावयाच्या वेळेस "इतक्या पैशात sumo घेऊन कोकणात फिरायला जाता येईल" हे ऐकायला मिळेल एवढे नक्की :) ....

पुढे चालू....... भेट देत रहा.

0 comments: