Monday, March 20, 2017

नाणेवाडीतले बाबाजी

"नाणेवाडी..नाणेवाडी.."
येष्टीचा कंडक्टर ओरडला.
"ओ भौ, नाणेवाडीला उतरायचंय नव्हं का?"
यशवंता खडबडून जागा झाला. लगबगीने सॅक उचलल्या आणि य़ेष्टीबाहेर पडला. पहाटेचे चार वाजले होते.
यश्वंता वडिलांच्या सत्तराव्या वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून, मुंबईला आपल्या घरी गेला होता.
तो मुळचा मुंबईचाच. जेव्हा प्रोफेसर नाणेकरांनी नाणेवाडीत आपली प्रयोगशाळा उघडली तेव्हा त्यांनी पेप्रात जाहीरात दिली, असिस्टंट पाहिजे म्हणून. मुक्काम नाणेवाडी, पोस्ट कवठे, असा पत्ता आणि पगार रू. पाच हजार फक्त. मोजून सात अर्ज आले. त्यात यश्वंताचाही होता. थर्डक्लासात का होईना, यश्वंता बेश्शी झाला होता. नाणेकरांना लॉटरीच लागली जणू. त्यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक इमेलने यश्वंताला कळवला. यश्वंताचा नेटपॅक संपला होता. पुढील बिलींग सायकल चारपाच दिवसांनी सुरु होत होती. आणि यश्वंताला काही सर्फींगची फारशी आवड नव्हती. दोन दिवसांनी तो मित्राकडे गेला असताना त्याने आपले इमेल उघडले. आणि दुसर्‍या दिवशी नाणेकरांना फोन केला. तिकडे नाणेकरांना धाकधुक वाटत होती. जाहीरातीचे दोन हजार वाया जातात की काय. गडी फोन करतोय की नाही. का कुणी दहावी पास माणूस घ्यायला लागतोय.
नाणेकरांनी फोनवर चवकशी केली. कॉलेजचे नाव. घरी कोणकोण असतं वगैरे. त्यांना एकूण ठिक वाटले. त्यांनी लगोलग ज्वाईन व्हायला सांगीतले. यश्वंताने परळला जाऊन कवठे नाणेवाडीची येष्टी कधी असते त्याची माहीती काढली. दुसर्‍या दिवशी रात्री दहाची एस्टी होती, परवाच्या दिवशी पहाटे नाणेवाडीत पोचत होती. त्याने रिजर्वेशन फिजरवेशन काही केले नाही. दहाबारा इंटरव्ह्यूचे कॉल्स दिले होते. त्यांपैकी एखाद्या चांगल्या ठिकाणी दुसर्‍या दिवशी लग्गा लागला तर हे नाणेवाडी प्रकर्ण क्यान्सल करायचे असा त्याचा बेत होता.
पण तसा लग्गा काही लागला नाही. तेव्हा मुकाट संध्याकाळी यश्वंताने सॅक भरली आणि साडेनऊला परळ डेपोत जाऊन नाणेवाडीची गाडी पकडली, दुसर्‍या दिवशी पहाटे नाणेवाडीला उतरला आणि पाच वाजता लॅबमधे हजर झाला. प्रोफेसर जागेच होते. त्यानी यश्वंताला चहा वगैरे दिला. एक डुलकी काढून दहा वाजता यश्वंता आणि प्रोफेसर दोघेही जागे झाले.
हे प्रोफेसर म्हणजे पुण्याच्या "एलियन्स रिसर्च इन्स्टीट्यूटमधली जानीमानी हस्ती. डॉक्टरेटनंतर त्यांनी इथे नोकरी पत्करली होती आणि अवघे आयुष्य परग्रहावरच्या प्राण्यांचा शोध घेण्यात घालवले होते आणि रिटायरमेंटनंतर आपल्या मुळ गावी, म्हणजे नाणेवाडीला येऊन तिथे एक परग्रहांवरुन येणार्‍या संदेशांचा शोध घेण्यासाठी म्हणून एक प्रयोगशाळा उघडली होती. या प्रयोगशाळेसाठी त्यांना सेठ तिरसिंगमल तसेच अमेरिकेतले संशोधक डॉ. जेम्स फनीमनी यांनी अर्थसाह्य केले होते.
प्रयोगशाळा म्हणजे एक आठ छोट्या, चार फूट बाय चार फूट आकाराच्या पेट्यांचा संच होता. प्रत्येक पेटी अवकाशाच्या एकेका हिश्श्याचा शोध घेत असे. तिथून येणारे प्रकाशकिरण, रेडीओलहरी, ध्वनीलहरी यांची नोंद ठेवत असे.
येशाचे काम एकच. दर बारा तासांनी प्रत्येक पेटी उघडायची आणि तिथल्या सीडी बाहेर काढायच्या, त्या हार्ड डिस्कवर विशिष्ट ठिकाणी कॉपी करायच्या आणि नव्या सीडी बसवायच्या. त्याचा मुक्काम तिथेच असायचा. कधी वाणसामान आणण्यासाठी म्हणून जर गावात जायचे असले तर तो प्रोफेसरसाहेबांना बोलावून घेत असे. यंत्र थोडावेळदेखील बंद ठेवायचे नसे. यंत्रासाठी एक डिझेलवर चालणारा जनरेटरही खास जर्मनीहून मागवला होता.
येशाने कामाला सुरुवात करण्याच्या आधी एका महीन्याने हव्या असलेल्या रजेबद्दल सांगितले होते. त्याच्या वडीलांचा सत्तरावा वाढदिवस होता त्यामुळे त्याला दोन दिवस रजा पाहिजे होती. नाणेकरांनी ते मान्य केले होते.
आणि आता रजा संपल्यावर येशा नाणेवाडीत परतला होता.
पहाटेची वेळ होती त्यामुळे अंधार होता. नाहीतर तिथल्या चौकात लागलेले बॅनर्स पाहून येशाला भोवळच आली असती.
येशा लॅबजवळ गेला. लॅबबाहेर एक पोलीसांची गाडी उभी होती. एक प्रेसची व्हॅनही उभी होती. व्हॅनबाहेर एक दाढी वाढवलेला तरुण, एक पांढरा कुर्ता आणि जीन्स घातलेली तरुणी, एक फाटक्या देहयष्टीचा कॅमेरामन अशी सटरफटर माणसे बसली होती. येशाला काहीच समजेना.
दारावरच्या हवालदाराने त्याला हटकले, हातानेच "काय?" असे विचारले.
"मी यशवंत.. इथे काम करतो. लॅब असिस्टंट म्हणून"
"हवालदार आत गेला आणि थोड्यावेळाने प्रोफेसर खिडकीतून मुंडी बाहेर  काढली. हवालदाराने त्याला आत जाण्याची खुण केली.
आत गेल्यागेल्या अगोदर प्रोफेसरांनी त्याला पेढा दिला.
"अहो, कशाबद्द्ल?"
"तू खा तर अगोदर."
त्याने पेढा खाल्ला.
"अजून हवाय का?"
"नको, जागरण झालेय. आता तरी सांगा."
"अरे आपली मेहनत फळाला आली."
"म्हण्जे?"
"अरे बाबा प्रकटले"
"कॉय?"
"अरे हो, लेंगेवाले बाबा नाणेवाडीवाले. परग्रहावरचे बाबा. त्यांनी या यंत्राने अगोदर आपली दिव्य तस्वीर पाठवली. आणि कदाचित दस्तुरखुद्द तेच इथे येणार आहेत."
"काय म्हणता सर? मला समजतच नाहीये."
"अरे सांगतो, तु गेलास त्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी बाराला मी पेट्या उघडल्या सीड्या काढल्या आणि थोडावेळ झोपलो. उठून सीड्या कॉपी केल्या आणि डाटा डिकोडींगचे सॉफ्टवेअर चालवले आणि इमेजेस बघू लागलो. आणि तेव्हाच बाबांनी दिव्य दर्शन दिले."
"?????"
"अरे जरा बाहेर जाऊन बघ, समोरच्या झाडावर बाबांची तस्वीर लटकावली आहे. तेच हे परग्रहवासी बाबा, ज्यांनी संदेश दिलाय. "मी येतो आहे. काळजी नसावी."
त्यांची तस्वीर होती आणि खाली हा संदेश. अंतराळातल्या A324ZA  या भागातून आलेला.
यश्वंता पळतच बाहेर गेला.
दहा मिनिटे झाली. यश्वंता काही परत ये‍ईना.
शेवटी प्रोफेसरच उठून बाहेर आले.
यश्वंता समोरच्या बॅनरकडे मोठ्ठाल्या डोळ्यांनी बघत होता.
झालास ना मंत्रमुग्ध, बघ बघ, कसा सात्विक चेहरा, त्याच्यावरचा जाडा चष्मा.. तो स्वर्गीय चट्टेरीपट्टेरी लेंगा.. अहाहा.."
प्रोफेसरांनी भक्तीभावाने हात जोडले.
"अहो हे तर माझे बाबा आहेत." भानावर येऊन येशा म्हणाला.
"होय रे होय. आपल्या सर्वांचेच बाबा आहेत ते."
"नाही हो, माझे बाबा आहेत. ज्यांच्या वाढदिवसाला मी गेलो होतो. हवं तर मी तुम्हाला त्यांचे कालच काढलेले फोटो दाखवतो.
दोघे लगबगीने आत गेले.
येशाने वाढदिवसाचे फोटो दाखवले.
हुबेहुब तोच चेहरा.
"अरेच्चा.. हे तुझे वडील आहेत?"
"म्हणजे काय? कालच तर त्यांचा सत्तरावा वाढदिवस होता."
"अरे पण मग हे या सीडीत कसे आले?"
"तोच तर विचार करतोय मी."
थोडावेळ असाच शांततेत गेला.
एकाएकी यश्वंताची ट्युब पेटली.
त्याने खिशातून पाकीट काढले आणि प्रत्येक कागद उलटापालटा करुन पाहिला.
"मला वाटतं मला समजलाय सर" काहीशा उत्तेजीत स्वरात येशा म्हणाला.
"आता काय म्हणतोयस?"
"मला वाटतेय, माझ्या खिशात वडीलांचा फोटो होता. तो रात्री पेटी उघडल्यावर पेटीत पडला आणि काचेला चिकटला. आणि तोच या सीडीत स्कॅन झाला."
प्रोफेसरांनी थोडावेळ विचार केला.
"आणि मग "मी येतोय काळजी नसावी" असा संदेश? त्याचे काय?"
"मी बाबांना पत्र लिहीले होते, त्यात हेच शब्द होते. त्या पत्राचा एक भाग मला वाटते फाटला असावा आणि तोही चुकून पेटीत पडला असावा."
"नक्की सांगतोयस?"
"होय, शंभर टक्के."
प्रोफेसर लगबगीने उठले आणि त्यांनी तिरसिंगमलांना फोन लावला. एकदाचा रहस्यभेद झाला होता.
पण झाले उलटेच. पहिल्यांदा आनंदी असलेला त्यांचा स्वर नंतर क्रमाक्रमाने ताणलेला होत गेला. शेवटीशेवटी तर त्यांची बोलतीच बंद झाली. ते फक्त अस्वस्थपणे कपाळावरचा घाम टिपू लागले.
फोन ठेवल्याठेवल्या त्यांनी घटाघट एक ग्लासभर पाणी प्यायले.
यशवंता काळजीत पडला.
त्यांनी तसाच डॉ. फनीमनींना फोन लावला.
बराच वेळ फोन एंगेज लागत होता.
शेवटी एकदाचा लागला. फनीमनी त्यांच्याच फोनची वाट बघत असावेत.
फनीमनीशी तर ते काही बोलूच शकले नाहीत.
त्यांना सर्वकाही तिरसिंगसेठनी अगोदरच सांगीतले होते.
फोन ठेवल्यावर तर त्यांची सगळी रयाच गेली होती.
यश्वंताने थोडा वेळ जाऊ दिला.
"काय झालं सर?"
"अरे काय सांगू?" प्रोफेसरांनी एक आवंढा गिळला.
"तो तिरसिंग आणि फनीमनी, दोघांचे या प्रयोगशाळेत स्टेक्स आहेत, तिरसिंगने चमत्कारी बाबा सापडल्याचा दावा केला आहे, तर फनीमनीने हे सर्व थोतांड असल्याचे सांगीतले आहे. दोघेही एकेका न्युजबाईटचे पाच्पाच हज्जार डॉलर्स घेतात."
"अस्स आहे होय"
प्रोफेसर खोल विचारात बुडून गेले.
......

No comments: