Friday, May 26, 2017

व्यवस्थापकांच्या आणखी काही जाती:

खुलासा: एकूण आजूबाजूचे स्फोटक वातावरण लक्षात घेतले तर "जाती" हा शब्द ज्वलनशील वाटतो. त्यामुळे हा शब्द Caste या अर्थी घ्यायचा नसून Specie अशा अर्थाने घ्यायचा आहे. खुलासा संपला.)
आता व्यवस्थापकांच्या आणखी काही जाती पाहूयात.
१)कर्नल: यांचा बाणा लष्करी असतो. खरेखुरे कर्नलही काहीवेळा मवाळ वाटतील असे यांचे वागणे असते. वेळ, मॅनर्स, नियम, पोटनियम इ. जस्सेच्या तस्से पाळले गेले म्हणजे गेलेच पाहीजेत असा यांचा आग्रह असतो. मग नियम पाळण्याच्या नादात कामाचा बोर्‍या वाजला तरी बेहत्तर. समजा, कॉरीडॉरमधून जाताना समोरुन एखादा कर्मचारी येत असला तर त्याने आपल्याला कालमानाप्रमाणे गुड मॉर्निंग/अफ्टरनून/नाईट म्हटले पाहीजे. मग ते त्याच्याकडे अपेक्षेने बघत रहातात. त्याने म्हटले नाही तर हेच त्याला थांबवून तसे म्हणतात. त्यांच्या चेहर्‍यावर अशा वेळेला "काय माणूस आहेस की जनावर?" असे भाव असतात.
सकाळी दहाची कचेरीची वेळ असेल, तर दहा वाजून पाच मिनटांनी मस्टर आत म्हणजे आत. दहा वाजता येऊन बारापर्यंत चकाट्या पिटणारा यांना अकरा वाजता येऊन बारापर्यंत एकाग्र हो‍ऊन चार तासांचे काम एका तासात करणार्‍यापेक्षा आवडतो.
एखादा नियम चुकीचा, जाचक आहे असे सांगीतलेले त्यांना अजिबात खपत नाही.
इथे कुठेतरी वाचलेली एक गोष्ट आठवते. एका लष्करी संशोधन संस्थेत कर्मचार्‍यांना आत येताना आणि बाहेर जाताना सही करण्याची सक्ती होती. तशी असणारच. पण संस्थेच्या भिंतीला एक भलेमोठे भगदाड पडले होते. तिथून कुत्री, मांजरे डुकरे, गाढवे असे वेगवेगळे प्राणी सुखेनैव संचार करत. एक नवनियुक्त तरुण शास्त्रज्ञाने प्रमुखाला पत्र लिहून कळवले की असे असे भगदाड आहे, त्यातून कुणीही आत येऊ शकते. तेव्हा एकतर भगदाड बुजवावे किंवा सही करण्याचा नियम रद्द करावा. प्रमुख लष्करातला होता. हा कालचा पोर, याला कितीसे महत्व द्यायचे असा विचार करुन त्याने पत्राला केराची टोपली दाखवली.
मग या संशोधकाने पठ्ठ्याने काय करावे? एकदा सही करुन आत आल्यावर तो भगदाडातून बाहेर जायचा आणि परत गेटवर जायचा. म्हणायचा, मला आत यायचंय, तुमच्या नियमाप्रमाणे सही करुन. आता गोची अशी व्हायची की त्याची एकदा आत आल्याची सही असायची, बाहेर पडल्याची मात्र नाही. मग जो माणूस बाहेर गेला नाही, तो परत आत कसा आला? पहारेकरी त्याला सांगायचे, तुझी एकदा सही झाली आहे, आता तू असाच आत जा. हा हटून बसला, तुमचाच नियम आहे ना? आत येताना सही करण्याचा? मग? शेवटी पहारेकर्‍यांनी सिक्युरीटी चिफला, चीफने त्याच्याहुन वरीष्ठाला असे करत करत थेट केंद्राच्या प्रमुखापर्यंत मॅटर गेले आणि त्याला शेवटी भिंतीतले भगदाड बुजवावे लागले.
२) परीपुर्णतावादी (Perfectionist)
 फारच हटवादी. यांची समजूत अशी असते की परदेशी विशेषतः जपानी लोकांनी जी काही प्रगती केली आहे ती त्यांच्या परीपुर्णतेच्या आग्रहामुळे. तसे पाहीले तर हे अगदीच बरोबर वाटते. आणि जिथे जितके पाहीजे तिथे तितके परीपुर्ण असलेच पाहीजे.
पण इथे एक ग्यानबाची मेख आहे. परीपुर्णता काही फुकटची मिळत नाही. त्यासाठी रिसोर्सेस लागतात.
स्थापत्य अभियांत्रिकीमधले उदाहरण घेऊ: नकाशात समजा दोन भिंतीमधले अंतर पाच मिटर दाखवले आहे. तर पाच मीटर अधिक किंवा उणे एक सेंटीमिटर  (किंवा सोप्या शब्दात: पाच मीटर, एक सेंटीमिटर इथेतिथे चलता है) असे सांगीतले तर गवंडी दोन भिंती आठ तासात बांधू शकतात. तेच, पाच मिटर, अधिक उणे एक मिलीमिटर असे सांगित तर गवंड्यांना जास्त काटेकोरपणे काम करावे लागेल. जास्त वेळ लागेल.
या जास्त वेळाचे पैसे तुमच्या खिशातून जातील. याही पुढे जात, तुम्ही दोन भिंतीतले अंतर मायक्रॉन्समधे मोजण्याचा दुराग्रह धरलात तर जगातला एकही शहाणा गवंडी तुमच्या दिशेने फिरकणारही नाही.
समजा, तुम्हाला पाच मीटर बाय पाच मीटरची खोली विकत घ्यायची आहे. तुमच्यापुढे दोन अगदी एकसारख्या खोल्या आहेत. एका खोलीची किंमत पाच लाख आहे, दुसर्‍या खोलीची दहा लाख.
पहीली अत्यंत ढिसाळ अशा देशी लोकांनी, मागास अवजारे वापरुन बांधली आहे. यात दोन भिंतीतले अंतर पाच मीटरपेक्षा एकतर एक सेंटीमीटर जास्त असेल किंवा कमी.
आणि दुसरी दहा लाखाची खोली एका परीपुर्णतेच्या पुजार्‍याने बांधली आहे. त्यासाठी त्याने खास जर्मनीहून मेड टू ऑर्डर अशी यंत्रे बनवून घेतली. वेचक गवंडी निवडून त्यांना या यंत्रांवर प्रशिक्षण दिले. आणि साहजिकच तो अशी जागतीक दर्जाची खोली दहा लाखाला विकत आहे. दोन भितीमधले अंतर पाच मीटरपेक्षा एका मायक्रॉनने एकतर जास्त असेल किंवा कमी. लेखी हमी.
तुम्ही दुसरी खोली घेतलीत तर एकतर तुमच्याकडे जादाचा पैसा आहे आणि दुसरी खात्रीची गोष्ट म्हण्जे तुम्ही खोली बांधणार्‍याहूनही जास्त मुर्ख आहात.
उदाहरण जरा अतिशयोक्त असेल, पण याच्या जवळपास जाणारे लोक असतात.
लांबण लावली का?
पुढील भागात थोडेसे सकारात्मक. म्हणजे चांगल्या मॅनेजर्सबद्दल.

No comments: